शिवसेना आमदार दिलीप लांडे यांची मागणी
चांदिवली विधानसभा मतदारसंघ बहुतांशी डोंगराळ विभाग असून आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. चांदिवली विधानसभा क्षेत्रासाठी ३२ कुर्ला हे एकमेव शिधावाटप कार्यालय असून सद्यस्थितीत नेहरूनगर कुर्ला पूर्व येथे आहेपरिणामी चांदीवली विधानसभा क्षेत्रातील तुंगागाव-पवई, चांदिवली- साकीनाकापरेरावाडी-मोहिली व्हिलेज,असल्फा गाव येथील नागरिकांना शिधापत्रिकेच्या कामासाठी साधारणतः चार ते पाच किलोमीटर लांब पल्ल्याच्या अंतरावर जावे लागते. त्यामुळे चांदिवलीमधील सफेद पूल साकीनाका येथील मनपाच्या राखीव भूखंडावर नवीन शिधावाटप कार्यालय सुरू करण्याची मागणी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे केली.
शिधावाटप कार्यालयाअभावी चांदिवलीमधील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा वेळ व पैसा यांचा अपव्यय होत असून वर्षानुवर्षे नाहक त्रास सोसावा लागत आहे. चांदिवली साकीनाका येथील महानगरपालिकेच्या आरक्षित भूखंडावर नवीन शिधावाटप कार्यालय बांधून मिळावे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सातत्यपूर्ण पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आहे. परंतु अधिकारी दुर्लक्ष करीत असून शासन स्तरावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही. चांदिवलीमधील नागरिकांची शिधावाटप कार्यालयाअभागी होणारी गैरसोय टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या सफेद पूल, साकीनाका येथील भूखंडावर कार्यालय तत्काळ सुरू करण्याची मागणी आमदार दिलीप लांडे यांनी केली.